न विसरता येणारा 'अभ्यास' ...

इयत्ता ४ थीत असताना पहिल्यांदाच शिवाजी महाराजांची गाठ पडली....

 पहिल्याच पानावर राजे घोड्यावर बसलेले आणि सोबत मावळे असे चित्र आजही आठवते. इतिहासाचे संपुर्ण पुस्तकच महाराजांचा पराक्रम सांगत होतं. शौर्य, धैर्य, बुध्दिमत्ता, चातुर्य, लढाऊपणा, सर्व काही अगदी एखाद्या दैवी कथेप्रमाणे पानापानावर ओसंडून वाहत होतं. शिवरायांचे बालपण, शिवनेरी किल्ल्यावरील राजांचे जन्मस्थानाचा फोटो, रायरेश्वर मंदिरात बेलपत्र वाहून बालशिवबाने घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा पाहताना आपल्यालाही मावळा वाहयाचं होतं ते चित्र आठवते का ?




अफजलखानाने हात पसरुन राजांना दिलेलं आलिंगन आणि राजांनी काढलेला कोथळा हे वाचताना त्या बालवयातही हाताच्या मुठ्या आवळल्या जायच्या. आग्र्याच्या दरबारातील तो प्रसंग बादशहाच्या हातावर तुरी दिल्या, हे शिवरायांनी आम्हाला जगावं कसं हे शिकवलं.

 गड आला पण सिंह गेला हा धडा वाचत असताना तानाजीसाठी शिवरायांना हळहळताना वाचून डोळ्यांच्या पापण्या ओल्या वाहायच्या ....... त्या वयातच शिवराय मनात घर करुन राहिले.

आजही माझ्या ऐतिहासिक पुस्तकांच्या संग्रहात ते इयत्ता चौथीच अर्ध फाटलेलं पुस्तक मी जपून ठेवलेल आहे. जेव्हा कधी बालपणाच्या आठवणीत घुसावसं वाटतं तेव्हा ते पुस्तक काढतो अन् पुन्हा वाचत बसतो.



अंदाजे १०० च्या आसपास शिवचरित्रावरील पुस्तके मी वाचली आहेत, काही माझ्या संग्रहातही आहेत. पण माझ्या सारख्याचं अनेक शिवभक्तांना शिवचरित्रावरील अभ्यासाची पहिल्यांदा गोडी लावली, ज्याने पहिल्यांदा महाराज, हिन्दवी स्वराज्य, त्यांचे ते मावळे, ते बाजी, ते तानाज, त्यांचे विजयी अश्व, शिवराज्याभिषेक या साऱ्यांची पहिली ओळख ज्या पुस्तकाने करुन दिली ते इयत्ता चौथीचं पुस्तक आजही हातात घ्यावसं वाटतं, त्यापुस्तकाचा सुगंध घेतला की अंगावर शहारा येतो. आपल्या पैकी अनेक जण आज व्याख्याते झाले असाल, शिवचरित्रावर अनेक पुस्तके वाचली असाल, पण ते पुस्तक आठवते का ? इयत्ता चौथी इतिहास पुस्तकावर ठळक अक्षरात लिहिलेलं 'शिवछत्रपति' आठवतं का ? आजच्या तरुणपिढीला ते सुख मिळत असेल का ? शेकडो पुस्तके वाचण्याआधी ज्याने माझ्या बालवयातच माझी आणि शिवछत्रपतींची भेट घालून दिली, फक्त माझीच नाही तर तुमच्यासारख्या करोडों शिवभक्तांना पहिल्यांदा राजे कळले ते याच इयत्ता चौथीच्या पुस्तकामुळे ! खरं ना ?

माझ्या सारख्या लाखो शिवभक्तांना शिवचरित्राकडे ओढणाऱ्या त्या इतिहासाच्या पुस्तकाचे ऋण मी कधीही विसरणार नाही. आणि तुम्ही ?

                      जय शिवराय !

         सर्वाधिकार - © बळवंतराव दळवी
                    २९ डिसेंबर २०१३


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

शिवछत्रपतींच्या सुवर्ण सिंहासनाची आज गरज काय ?