भिडे गुरुजी यांची स्फोटक मुलाखत
भिडे गुरुजींची स्फोटक मुलाखत
बेधडक - जशी आहे तशी
मनू, डॉ.बाबासाहेब आणि आंबेपुराणावर काय बोलले भिडे गुरूजी?
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांची सोमवारी न्यूज18 लोकमतचे समुह संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी ‘बेधडक’ कार्यक्रमात मुलाखत घेतली. ही मुलाखत स्फोटक ठरली. सोशल मीडियावर आणि सर्वच स्तरावर यावर घनघोर चर्चा झाली ती ही मुलाखत आहे. मनपस्मृती, आंबेपुराण, ज्ञानोबा-तुकोबा, राज्यघटना, मुस्लिम, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप-शिवसेना युती अशा सगळ्या विषयांवर त्यांनी आपली बेधडक मतं व्यक्त केली.
प्रश्न – नाशिक महापालिकेच्या गर्भलिंग निदान समितीच्या चौकशीत तुम्ही दोषी आढळून आले आहात. याच अहवालावरून तुमच्यावर न्यायालयात खटलाही दाखल होण्याची शक्यता आहे. तुम्ही दोषी आढळलात तर तीन वर्षांची शिक्षा आणि 10 हजाराचा दंड होणार आहे. कसा बचाव करणार तुम्ही?
भिडे गुरुजी : माझ्या वक्तव्यावरून भ्रामक कल्पानाविलास सुरू आहे. मी काय म्हणालो याचा नेमका अर्थ कळण्यासारखा मेंदू ऐकणाऱ्यांमध्ये विकसित झाला नाही त्यामुळे भिडे हे अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप होतो. आंबा प्रकरण म्हणजे विश्वाचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या मेंदू येवढा त्यामुळं त्याला जे कळलं ते त्यांनी मांडलं.
प्रश्न – तुम्ही विज्ञानाचे प्राध्यापक होता, मात्र तुम्ही कधी विज्ञानावर बोलत नाही, इतिहास, पुराणकाळात जास्त रमता. वाद निर्माण व्हावा, गैरसमज निर्माण व्हावेत यासाठी तुम्ही असं बोलता का? नेमकं काय आहे?
भिडे गुरुजी: जे याबद्दल बोलताहेत त्यांनी आधी अभ्यास करावा. ऑस्ट्रेलियात या आंब्याच्या वाणावर अभ्यास झाला आहे. या आंब्यात नपुंसकत्व आणि वंध्यत्व घालवण्याचा गुण असल्याचं सिद्ध झालं आहे. बंगळूरू आणि म्हैसूर इथल्या संशोधनातही या आंब्याचा हा गुण दिसून आला. राज्याच्या कृषी क्षेत्रात अनेक वर्ष काम केलेल्या अधिकाऱ्याने या आंब्यावर ‘आंबा वाण’ हे पुस्तक लिहिलं आहे. जेव्हा गरज पडेल तेव्हा मी हे सर्व पुरावे कोर्टात मांडेन आणि टीका करणाऱ्यांचे दात त्यांच्याच घश्यात घालेन.
प्रश्न – तुम्ही एवढी उदाहरणं देताय, खरच तुम्हचा विश्वास आहे की असा आंबा खाल्ल्याने नपुंसकत्व जातं?
भिडे गुरुजी : अहो ते विज्ञान आहे. नपुसंकत्व घालवून पौरूषत्व प्राप्त करण्यासाठी औषधं आहेत. ते विज्ञान आहे आणि सिद्धही झालंय. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत.
प्रश्न – तुम्ही असं वक्तव्य केलं नाही असा तुमच्या समर्थकांचा दावा होता आणि आता तुम्ही त्याचं समर्थन करत आहात.
भिडे गुरुजी : होय मी ते विधान केलं आहे. पण त्यामागचा अर्थ समजून घेण्याची शक्ती हिंदू रक्तात नाही. राष्ट्रीयत्वाची भावना हिंदू रक्तात नाही त्यामुळं मी जे बोलतो ती जाणण्याची क्षमता नाही. मी त्यावेळी नेमकं काय बोललो ते सांगतो. एका आंब्याने जर माणसाला पौरुषत्व मिळू शकतं तर आपल्या देशातल्या 123 कोटी जनतेच्या रक्तातलं पौरूषत्व का जागृच होऊ शकत नाही. ते सामर्थ्य जागृत होण्यासाठी शिवाजी आणि संभाजी हा महामृत्यूंजय मंत्र आहे. या मंत्रानेच माणसाचं सामर्थ्य जागं होऊ शकतं. हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता. यात काय चूक आहे. ज्यांना राष्ट्रीयत्वाची शिसारी ज्यांच्या रक्तात आहे त्या हिंदू समाजाला हे पटणार नाही.
प्रश्न – गुरूजी तुम्ही धारकरी होता हे आम्हाला माहित होतं, मात्र तुम्ही वारीत केंव्हापासून जावू लागलात?
भिडे गुरुजी : वारीची माझ्या घराण्याची ही तेरावी पिढी आहे. मी दरवर्षी वारीत जातो आणि भगवंताचं दर्शन घेतो. या देशासाठी काही करण्यासाठी शक्ती,बुद्धी दे असं मागणं भगवंताला मागतो.
प्रश्न – मग मागच्या वेळी वाद निर्माण का झाला. तुम्ही पालखी मार्गात अडथळा आणला असा आरोप झाला?
भिडे गुरुजी : या आरोपातही तथ्य नाही. पालखीचे चोपदार राजाभाऊ यांनी मला भेटून सांगितलं की वादाविषयी आम्हाला काहीच माहिती नाही. त्यामुळं उगाच वाद निर्माण केला गेला. भिमा कोरेगावची दंगल मी आणि मिलिंद एकबोटे यांनी घडवली असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला होता. संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यांनी ही नावं मला दिली अशी माहिती आंबेडकरांनी दिली होती. त्या संघटनांचेच हे प्रताप आहेत. पेटवणाऱ्या काही संस्था आपल्या समाजात आहेत. भिमा कोरेगावचं प्रकरण हे त्यांनीच पेटवलं आणि वारीचा वादही त्यांनीच निर्माण केला. या असंतुष्ट आत्म्यानीच हे सर्व घडवलं.
प्रश्न – गुरूजी, ज्ञानोबा-तुकोबांचा मार्ग हा शांततेचा मार्ग आहे. तर धारकऱ्यांचा मार्ग हा हिसेंचा आहे. मग वारकरी आणि धारकरी यांची सांगड का घालता?
भिडे गुरुजी: श्रीशिवाजी आणि श्रीसंभाजी हे जगण्याचे मंत्र आहेत. शिवछत्रपती हे देशासाठी कसं जगावं हे शिकवतात तर संभाजी महाराज हा मरणाचा मार्ग आहे. देशासाठी कसं जगावं आणि मरावं हे शिवाजी आणि संभाजी आपल्याला शिकवतात. राष्ट्रीयतत्व निर्माण करणारे हे दोन महापुरूष आहे. आत्मोन्नती, आत्मोद्धार आणि आत्मसाक्षात्कार याची ताकद जसं ज्ञानोबा-तुकोबां देतात तसं राष्ट्रोध्दार, राष्ट्रोन्नती आणि राष्ट्रसाक्षात्काराचा मार्ग हा श्रीशिवाजी-संभाजी देतात. या दोनही गोष्टी समजणारं हिंदू मन तयार व्हावं यासाठीचं हे काम आहे.
प्रश्न – राष्ट्रोद्धाराचं काम करणाऱ्या तुम्हाला वारीत पोलीस संरक्षण का लागतं?
भिडे गुरुजी : हे सरकारला आणि आरोप करणाऱ्यांना विचारलं पाहिजे.
प्रश्न – हा आत्मोन्नतीचा अधिकार मुस्लिमांना नाही का? तुमच्या धारकऱ्यांमध्ये किती मुसलमान आहेत?
भिडे गुरुजी: का असणार नाही. हा अधिकार प्रत्येकाला आहे. राष्ट्राशी एकरूप होण्यासाठी त्यांनी हा मार्ग जोपासला पाहिजे. तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही धारकरी का होत नाही. अहो हिंदूच जर पूर्णपणे आमच्यात येत नसतील तर मुसलमान येतील अशी चिंता आम्ही का करावी. आमच्याकडे मुसलमान किती येतात यावर आम्ही आमच्या कामाचं मुल्यमापन अवलंबून नाही .
प्रश्न – तुमच्यावर असा आरोप केला जातोय की ध्रुविकरणासाठी तुम्ही मुस्लिम विरोध जापासताय?
भिडे गुरुजी: भारत माता की जय असं न म्हणणाऱ्यांना आमचा विरोध आहे. प्राण गेला तरी भारत माता कीय जय म्हणणार नाही असं ओवेसी म्हणतो तो तुमचा आदर्श आहे का? अशा लोकांना आमचा विरोध आहे .
प्रश्न – मनु हा ज्ञानोबा आणि तुकोबांच्या एक पाऊल पुढे होता असं तुम्ही म्हणाला होता, काय आहे तुमची भूमिका?
भिडे गुरुजी : मुळात मी अशी तुलनाच केली नाही. ज्ञानोबा, तुकोबा आणि मनू हे तिघही देव, देश आणि धर्मासाठी जगली आहेत. देवाला वाहिली जाणाऱ्या फुलांमध्ये जसा भेद केला जावू शकत नाही तसच हे आहेत. असा भेद मी केला नाही.
प्रश्न – ज्ञानोबा तुकोबांनी समतेचा पुरस्कार केला तर मनूने चातुवर्ण्य व्यवस्था जोपासली. स्रियांना पुरूषांएवढे अधिकार मनूने नाकारले हे तुम्हाला मान्य आहे का?
भिडे गुरुजी: कसं मान्य असेल? तुम्हाला मान्य नाहीत म्हणजे मला मान्य नाहीत. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे .
प्रश्न – एका हातात राज्यघटना आणि दुसऱ्या हातात मनुस्मृती दिली तर तुम्ही कोणता ग्रंथ निवडाल?
भिडे गुरुजी: राजस्थान विधानसभेच्या आवारात मनूचा पुतळा आहे. त्या पुतळ्याच्या कट्ट्याखाली बाबासाहेबांचं एक वाक्य कोरलं आहे. त्या ते म्हणतात मनू हा जगातला पहिला कायदेपंडित आहे. घटना देशाला समर्पित करताना बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मनुस्मृतीचा अभ्यास करूनच मी राज्यघटना लिहिली आहे. शोध घेतला तर त्याचे पुरावे मिळू शकतील.
साप साप म्हणून भूई धोपटणं आणि मनूच्या नावाने शिमगा कऱणं हे देशात सुरू आहे. एखादी गोष्ट ताज्य म्हणजे सर्वच वाईट हे योग्य नाही. लोकांनी एकदा मनुस्मृती वाचली पाहिजे. मनुने जगाच्या कल्याणासाठी अनेक गोष्ट सांगितल्या आहेत. मलायात सभागृहात मनूचा पुतळा आहे. जपानमध्ये मनुस्मृतीला मानलं जातं. अनेक पाश्चात्य विद्यापीठांमध्ये मनुस्मृतींचा अभ्यास केला जातो. कसला दगडाचा मनूवाद आहे.
प्रश्न – मनुस्मृतीला जाळून टाका अशी मागणी आंबेडकरी समाजाकडून झाली होती हे माहित आहे का?
भिडे गुरुजी : हो, माहित आहे. ते दुर्दैवी आहे.
प्रश्न – तुम्ही जाती-पातीबद्दल का बोलत नाही कधी?
भिडे गुरुजी: तुम्ही माझी भाषणं ऐकायला या कधी तरी. मी माझ्या कार्यकर्त्यांना हे नेहमी सांगत असतो की जाती-पाती नष्ट केल्या पहिजे. सर्व जाळून टाकले पाहिजे. श्रीशिवाजी-संभाजी नावाचा अग्नी समाजाच्या अंत:करणात पेटवला पाहिजे, हा अग्नी पेटवल्याशीवाय जाती पाती जळून जाणार नाहीत. त्यासाठीच आमचा खटोटोप आहे. पण याला कुणी प्रसिद्धी देत नाही .
प्रश्न – पण महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी मनुस्मृतीचं समर्थन केलं नाही. घटनेनुसारच कारभार चालतो असं त्यांनी सांगितलं.
भिडे गुरुजी: हो बरोबर आहे. त्यांचं म्हणणं एवढच असावा की आमचा कारभार मनुस्मृतीनुसार नाही तर पूज्य बाबसाहेबांच्या घटनेप्रमाणं चालेल एवढाच आहे.
प्रश्न – महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने चाललाय, हा मार्ग आपल्याला मान्य आहे का?
भिडे गुरुजी: का नाही असणार? फुले शाहू आंबेडकरांचा मार्ग आहे तसाच ज्ञानोबा तुकोबांचाही मार्ग आहे, श्रीशिवाजी - संभाजींचाही मार्ग आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे.
प्रश्न – तुमचा मास्टर माईंड कोण आहे असा प्रश्न विचारला जातोय?
भिडे गुरुजी : भगवान छत्रपती शिवाजी, भगवान संभाजी, ज्ञानोबा, तुकोबा हे माझे मास्टर माईंड आहे. यापेक्षा दुसरा मास्टर माईंड कुठला असू शकतो. जे प्रश्न विचारतात त्यांनाही जेव्हा कळेल की आपला मास्टर माईंड हेच आहेत तेव्हा ते असे बालीश प्रश्न विचारणार नाहीत.
प्रश्न – तुमची 2014 च्या सुमारास भेट झाली होती. सध्या तुमच्यावर आरोप होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर तुम्ही मोदींची काही मदत मागितली का?
भिडे गुरुजी: कशाला मागायची मदत? अजिबात मागणार नाही. त्यानंतर मी मोदींना दोनदा भेटलो. शिवसेनेशी युती तुटली तेव्हा मला खूप वाईट वाटलं. तेव्हा मी त्यांना भेटलो आणि सांगितलं की युती तुटणं हे मोठं पाप आहे असं मी त्यांना सांगितलं. हे पाप तुम्हीच निस्तरू शकता हे मी त्यांना सांगितलं होतं.
प्रश्न – एकबोटेंना अटक झाली, तुम्हाला नाही असा प्रश्न विचारला जातो.
भिडे गुरुजी: त्याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला त्यामुळे त्याला अटक झाली. तो देशभक्त आहे. असं पाप करणार नाही. सत्यासाठी बोलतच राहणार त्यासाठी कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही. जे वाटलं ते बोलणारच.
प्रश्न – भारताचा हिंदू पाकिस्तान होईल असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.
भिडे गुरुजी : साबरमती सांप्रदायात जे वाढले त्यांना असंच वाटणार. इथल्या हिंदू समाजाच्या रक्तात गांढाळपणा खूप आहे. तो जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत त्यांना असच वाटणार. पुढच्या जन्मात ते साबरमती नाही तर रायगड संप्रदायात जन्माला आले तर असं त्यांना वाटणार नाही.
प्रश्न – राजकारणी तुमचा वापर करतील असं वाटतं का
भिडे गुरुजी : नाही. मी असा कुणीही वापरावा या वृत्तीचा नाही. मात्र देशासाठी कुणी चांगलं काही करत असेल तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे. माझा राजकारणाशी संबंध नाही. यापुढेही असणार नाही.
प्रश्न – उदय राजे आणि जयंत पाटलांनी तुम्हाला पाठिंबा दिला होता
भिडे गुरुजी : उदयन महाराज कुठल्या पक्षात आहेत याच्याशी आमचा संबंध नाही. ते छत्रपतींची वंशज आहेत त्यामुळं त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायम आदर आहे आणि राहिल .
बेधडक मुलाखत - संभाजीराव भिडे गुरुजी
Copyright © 2018 lokmat.news18.com — All rights reserved
लिखीत स्वरूपात मुलाखत मांडून योग्य काम केलत दादा..
उत्तर द्याहटवाधन्यवाद !
हटवादादा गुरुजींच लिखित स्वरूपात लिहल खुप छान वाटलं आणि वाचुन मनाला खुप आनंद झाला।।
उत्तर द्याहटवा