स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'हुतात्मा छत्रपती'
"मराठ्यांनी आपल्या शत्रूविरूध्द चालू केलेल्या क्रांतीयुध्दाच्या राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व करीत असता मराठ्यांचा हा राजा 'निधनाच्या क्षणात परिस्थितीचा प्रतिमल्लच नाही तर विजेता झाला !'
- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'हुतात्मा छत्रपती' संभाजी महाराजांवरील लेखाचे खंडण मंडण
थोर क्रांतिकारक, हिंदुत्ववादी विचारवंत, राष्ट्रीय इतिहासकार व साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या 'हिंदुपदपादशाही' ( १९२८ ) या गाजलेल्या ग्रंथातील छत्रपती संभाजी महाराजांवरील एक लेख 'हुतात्मा छत्रपती' यावर अनेक स्वा. सावरकरद्रोही लोकांनी त्या लेखातील एक दोन शब्दांवरुन गदारोळ माजवून स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काहीबाही पसरवायला सुरुवात केली आहे. त्या लेखामागील पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांनी १९९० साली प्रकाशित केलेल्या 'छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ' या संशोधनपर ग्रंथात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या लेखासंबधी विचारपूर्वक खंडण मंडण केले आहे. त्याच पुस्तकातील हा खालील उतारा ...
"थोर क्रांतिकारक, हिंदुत्ववादी विचारवंत, राष्ट्रीय इतिहासकार व साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 'हिंदुपदपादशाही' या गाजलेल्या ग्रंथातील 'हुतात्मा छत्रपती' हा लेख १९२८ साली लिहिला गेला तेव्हा संभाजी महाराजांविषयी नवे संशोधन उजेडात आलेले नव्हते. स्वाभाविकच बखरींनी व नाटककारांनी विकृतपणे रंगविलेले छत्रपती संभाजीराजे स्वा. सावरकरांपुढे उभे होते. त्यामुळे त्यांनी संभाजीराजांचे 'मदिरा आणि मदिराक्षी' यांच्या नादात गुरफटलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 'नाकर्ता पुत्र' म्हणून वर्णन केले आहे.
पण .....
पण संभाजीराजांचे हे तथाकथित दुर्गुण नमूद करूनही त्यांच्या अंतकाली त्यांनी प्रकट केलेल्या तेजस्वी रुपाने स्वा. सावरकर प्रभावित झाले आहेत. मराठ्यांनी आपल्या शत्रूविरूध्द चालू केलेल्या क्रांतीयुध्दाच्या राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व करीत असता मराठ्यांचा हा राजा 'निधनाच्या क्षणात परिस्थितीचा प्रतिमल्लच नाही तर विजेता झाला !' असे सावरकरांनी छत्रपती संभाजीराजांचे वर्णन केलेले आहे. एवढेच नव्हे तर त्यापुढे जाऊन स्वा. सावरकर म्हणतात, "संभाजीराजांनी आपल्या अतुलनीय हौतात्म्याने छत्रपती शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही तर ती अनेक पटींनी उज्ज्वलतर आणि बलशाली केली ! हिंदू धर्मासाठी आत्मबलिदान केलेल्या राजहुतात्म्याच्या रक्ताचे ह्याप्रमाणे पोषण मिळाल्यावर हिंदू स्वातंत्र्याच्या समराला विलक्षण दिव्यत्व आणि नैतिक सामर्थ्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे !"
याच लेखात स्वा. सावरकर पुढे लिहितात...
"आपल्या रानटी शत्रूच्या समोर हताश राजबंदी करून संभाजीराजांना आणले असताही तो राजा ताठ मानेने उभा राहिला आणि जीवनाचे मोल घेउनही आपला धर्म विकावयाचे त्यांनी स्पष्ट नाकारले. मरण टाळण्यासाठी धर्मांतर करावयाची कल्पना त्वेषाने धिक्कारली आणि आपल्या पुर्वजांच्या धर्माविषयीच्या निष्ठेचा पुर्नघोष करून त्यांनी मुसलमानी शत्रूंवर, त्यांच्या धर्मशास्त्रावर आणि विचारसरणीवर अपमानांचा आणि शिव्याशापांचा वर्षाव केला. या मराठ्यांच्या सिंहाला औरंगजेबाने 'या काफराचा वध करण्याविषयी आज्ञा केली '. पण त्या राक्षसी धमकावणीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्रावर थोडाच परिणाम होणार होता ! तापवून रक्त केलेल्या सळ्यांनी आणि सांडसांनी संभाजीराजांचे डोळे भोसकून बाहेर काढण्यात आले. त्यांच्या जीभेचे तुकडे तोडण्यात आले. पण या राक्षसी छळानेही त्या राजहुतात्म्याच्या धैर्याचा भंग झाला नाही. अंती त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. मुसलमानांच्या धर्मवेडात संभाजीराजा बळी पडला पण त्यांनी हिंदुजातीला अक्षय्य उज्ज्वलता आणून दिली. ह्या एका आत्यंतिक आत्मयज्ञाच्या कृत्याने संभाजीराजांनी महाराष्ट्रधर्माचे - हिंदू पुरुज्जीवनाच्या पवित्र चळवळीचे - आत्मस्वरूप जसे विषद करून दाखवले तसे दुसरे कशानेही दाखविणे शक्य नव्हते !
संदर्भ - छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ
डॉ. जयसिंगराव पवार
वरील सर्व उतारे वाचल्यावर आपल्याला सहज समजेल की १९०० च्या जवळपास मराठ्यांच्या इतिहासाचे ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ संशोधन सुरु झाले होते. आजपासून सुमारे १०० वर्षापूर्वीच्या इतिहासकारांनी
चिटणीस बखर, इंग्रज इतिहासकार ग्रॅंट डफ यासारख्या काहीनी लिहिलेल्या इतिहासाच्या आधारे छत्रपती संभाजी महाराजांवरील उपलब्ध साधनांवरुन त्यावेळी संभाजीराजांचा इतिहास चितारला होता. अगदी कालपरवा म्हणजे ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. वा. सि. बेंद्रे यांनी १९६० साली आणि त्यांच्यानंतर डॉ. कमल गोखले यांनी १९७१ साली पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांवर साधार, संशोधनात्मक आणि चिकित्सक चरित्र लिहून संभाजीराजांविषयी अनेक चुकीचे अपसमज, रुढ कल्पनांना छेद देत ऐन तारुण्यात हौतात्म्य स्विकारलेल्या शिवछत्रपतींच्या छाव्याला संभाजीराजांना न्याय मिळवून दिला.
म्हणूनच १०० वर्षापूर्वी केलेले लिखाण हे जाणीवपूर्वक अपमान करण्यासाठी केलेले लिखाण नसून त्याकाळात समोर असलेल्या उपलब्ध साहित्याच्या आधारे केलेले वर्णन आहे. त्यावरून आजच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर असो की जुने इतिहासकार असो त्यांना आज दोष देणे हे कदापि योग्य नाही.....
- ©बळवंतराव दळवी
( शिवचरित्र अभ्यासक )
@divyadrushti.blogspot.com/
खूप छान.
उत्तर द्याहटवाधन्यवाद !
हटवाछान आहे लेख.😊
उत्तर द्याहटवा