श्रीराम मंदिराचा मनाचा मोठेपणा दिसावा
किमान ५०० - ५५० वर्षाचा इतिहास पुन्हा बदलला जाणार आहे. याधी हा इतिहास गुजरातच्या सोरटी सोमनाथ या मंदिराबाबत घडला आहे. हिंदुस्थानाला लुटायला आलेला गझनीचा मुहम्मद याने सोमनाथचे मंदिर तोडून फोडून टाकले होते ते मंदिर पुनच्छ स्वतंत्र हिंदुस्थानात सरदार वल्लभभाई पटेल यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांची पर्वा न करता त्याच दिमाखात ते मंदिर उभं केल्याचा इतिहास आहे ........
असाच एक लुटारू बाबरने श्रीरामांचे जन्मस्थान उध्द्वस्त करून त्या ठिकाणी मस्जिद उभारली. दुर्दैवाने इतिहासात ती मस्जिद पुन्हा पाडून श्रीरामांचे मंदिर उभं करण्याच सामर्थ्य तेव्हा कोणातही नव्हतं.. ६ डिसेंबर १९९२ रोजी हजारों श्रीराम भक्त कारसेवकांनी बाबरी मस्जिद उध्वस्त केली आणि संपूर्ण भारतात त्यानंतर हिंदू - मुस्लिम दंगल उसळल्या. या दंगलीची सर्वात जास्त झळ बसली ती मुंबईला. ६ डिसेंबरला सुरु झालेले युध्द १२ मार्च १९९३ च्या मुंबई बॉंबस्फोटापर्यंत सुरुच होत. त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थान शांत होता पण मुंबई मात्र जळत होती.... मुंबई दंगलीत शेकडो हजारो लोकं मृत्यूमुखी पडली होती. बॉंबस्फोटाने हादरुन गेलेल्या मुंबईने श्रीराम मंदिरासाठी भोगलेल्या यातना आणि त्याचे व्रण आजही मुंबईकर आपल्या अंगाखांद्यावर घेऊन वाढत आहे. असा हा मुंबई - श्रीराम जन्मभूमीचा संबंध !
अनेक वर्षाच्या न्यायलयीन लढ्यानंतर अखेर बाबराच्या छाताडावर उभं राहून पुन्हा श्रीराम जन्मभुमीची पुर्नस्थापना होत आहे. भव्य राम मंदिर उभं केले जाणार आहे. लाखो - करोडो हिंदूंचे स्वप्न पुर्ण होत आहे. ५ ऑगस्ट २०२० ही तारीख इतिहासात सुवर्णक्षरांनी लिहिली जाणार असा हा सुदीन. कोणतेही आवाहन न करता स्वयंस्फूर्तीने घरोघरी दिवाळी साजरी होइल. दिवे लावले जातील, फटाके फोडले जातील.... जय श्रीरामाच्या गजराने संपूर्ण हिंदुस्थान दुमदुमून जाईल असा हा ऐतिहासिक दिवस !
पण ....
गेल्या काही दिवसात श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाला कोण कोण येणार, कोणाला आमंत्रण पाठवले गेले आहे आणि कोणाला नाही यावर चर्चा घडताना दिसत आहे. कोणत्याही एकाच हिंदुत्ववादी संघटनेने, व्यक्तीने किंवा राजकीय पक्षाने श्रीराम मंदिरासाठी प्रयत्न केलेले नाही. समस्त हिंदूनी त्यात एक हिंदू म्हणूनच सहभाग घेतला होता हे काहीजण विसरु लागले आहेत. आणि ऐतिहासिक अशा भूमिपूजनाला राजकीय रंग येउ लागल्याचे दिसून येत आहे.
कोणी कितीही राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरी श्रीराम मंदिर समितीने मनाचा मोठेपणा दाखवून सर्व साधू - संतांना, पिठाधिपतींना, हिंदुत्ववादी मान्यवरांना आमंत्रण द्यावे.. जे येतील त्यांचे स्वागत जे येणार नाहीत ते भविष्यात यातही राजकारण झाले असे म्हणू शकणार नाही... शेकडो वर्षाच्या लढ्याला यश येणाऱ्या दिवशी कोणाही एका पक्षाचा इव्हेंट होउ नये आणि श्रीराम मंदिराचा वापर राजकीय स्वार्थासाठी होउ नये हीच समस्त हिंदूची श्रीराम मंदिर निर्माण समितीकडून अपेक्षा आहे.
जय श्रीराम !
©divyadrushti blogspot 2020
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा