मिळालेली संधी - कथा व बोध

आटपाट नगरातील एका गावात एक पुरातन मंदिर होतं. त्या मंदिराचा वयोवृद्ध पुजारी तो करत असलेल्या धर्मकार्याबद्दल आजूबाजूच्या अनेक गावात प्रसिद्ध होता. पुजाऱ्याची देवावर अपार श्रद्धा भक्ती होती. गावातील लोकं त्या पुजाऱ्यांना खूप मानत... गावात काही अडिअडचण आली की पुजाऱ्याने सांगितलेले उपाय करून संकट दुर करण्यासाठी प्रयत्न केले जात.

अशाच एका पावसाळ्यात गावाशेजारील नदीला अचानक पूर आला. नदीचे पाणी गावात शिरायला लागले. लोकं आपआपले सामान वाचवण्यासाठी धडपड करु लागले. पाणी वाढत गेले. पुर्ण गाव पाण्याखाली जाणार अशी भिती वाटू लागली. गावातील काही लोकं मंदिरात असणाऱ्या पुजाऱ्यांकडे पोहचली. वयोवृद्ध पुजाऱ्यांना वाढणाऱ्या पुराबद्दल गावकऱ्यांनी सांगितले... "पुजारीबाबा, मंदिरातून बाहेर पडा. पुराचे पाणी वाढायला लागले आहे."
"मी हे मंदिर सोडणार नाही. माझा देव मला या संकटातून वाचवेल. तुम्ही जा !"  पुजारीने गावकऱ्यांना उद्देशून म्हटले. गावकरी नाईलाजाने परतले.

पाहतापाहता पुराच्या पाण्यात मंदिराच्या पायऱ्या दिसेनाशा झाल्या. गावकऱ्यांना पुजारी बाबांची चिंता लागून होती. त्यांनी ही गोष्ट बचावकार्य करणाऱ्या लोकांना कळवली. आणि एक बोट घेउन बचावकार्य करणारे सरकारी लोकं मंदिरात पोहचले. त्यांनी मंदिरात बसलेल्या पुजाऱ्यांना बोटीत येण्यास सांगितले. "पाणी खूप जास्त वाढले आहे ... पुजारीबाबा, बोटीत या !"
यावर पुजारी बाबांनी त्या बचावकार्य करणाऱ्या लोकांना सांगितले, "नाही, मी बोटीत येणार नाही. माझा देव मला या संकटातून नक्कीच वाचवेल ही माझी श्रद्धा आहे, तुम्ही जा आणि दुसऱ्यांना वाचवा माझी चिंता करु नका !"  बोट पुजाऱ्यांना सोडून परतली.

पुराने आता थैमान घालायला सुरुवात केली होती. पाण्याच्या पुरात असंख्य गोरढोरं वाहून गेली. घर शेती पाण्याखाली आली होती. मंदिराच्या देव्हाऱ्यात पाणी घुसले होते. पुजारीबाबा देवाचे स्मरण करत होते. इतक्यात आकाशात एक हॅलिकॉप्टर आलं त्यातून एक शिडी मंदिरापर्यंत खाली आली. पुजारीबाबांना हॅलिकॉप्टरमध्ये येण्यासाठी विनंती केली गेली. परंतु पुजारीबाबांनी मंदिरातच राहण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांनी पुन्हा ठामपणे आधीच्यांना जे सांगितले तेच यांनाही सांगितले...... हॅलिकॉप्टर माघारी गेलें.

.......... पुजारीबाबांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. पुजारीबाबांनी केलेल्या पुण्यकर्मामुळे त्यांना स्वर्गात जागा मिळाली. परंतु पुजारीबाबा नाराज होते ... देवाला हे समजताच देव पुजारीबाबांना सामोरे गेले. "काय झालं बाबा ? तुम्ही नाराज का आहात ?" 
नाराजीच्या सुरात पुजारीबाबा म्हणाले, "देवा, मी गेले अनेक वर्ष तुझी भक्तीभावाने, नित्यनेमाने पुजा केली. माझी तुझ्यावरची भक्ती कुठे कमी पडली की तू माझ्यासाठी धावून आला नाहीस ? तू असताना मी पुरात बुडालोच कसा ? सांग देवा सांग मला तू मला वाचवण्यासाठी का आला नाहीस ...."

देव हसले आणि म्हणाले, "अरे बाबा, जेव्हा गावात पाणी फार वाढले नव्हते तेव्हा जे गावकरी तुला  बाहेर काढण्यासाठी आले होते ते कोणी पाठवलेले ? ती बोट कोणी पाठवलेली ? आणि ते हॅलिकॉप्टर कोणी पाठवलेले ??  मी तुम्हाला वाचवण्यासाठी जे काही करु शकलो ते ते केलं पण तुम्ही आलेली संधी सोडून आपला हट्ट धरून बसलात त्याला मी काय करणार ? पुजारीबाबा, मी तुम्हाला मार्ग दाखवू शकतो. पण त्यावर चालायची बुध्दी तुम्हालाच सुचायला हवी ना ?" 
पुजारीबाबांना घडलेल्या गोष्टींची चुक समजली होती. देव कोणत्या रुपाने आला हे पुजारीबाबांना ओळखताच आले नाही !

तात्पर्य :-
आपल्याला मिळालेली संधी दवडू नका. संधी निघून गेली की नंतर पश्चात्ताप करून उपयोग नाही. आपल्याकडून झालेली चुक सुधारण्यासाठी वेळेवर पाऊल उचला. आपली चुक आपल्यालाच सुधारायला हवी इतरांना दोष देण्यात अर्थ नसतो. वेळ निघून गेल्यावर मिळालेली संधी पुन्हा येत नाही. आपण हट्ट धरून बसलो तर तो आपला अहंकार आहे !

सदर कथेचा संबंध कोणाशीही जोडू नये. जुळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??