हिंदू लोकांमध्ये 'राम राम' म्हणायची पध्दत किती जुनी आहे ?
२१ व्या शतकात विज्ञान युग सुरु असताना अनेक लोकं हिंदू धर्मातील परंपरागत सुरु असलेल्या चालीरीतीवर टिका करताना वेगवेगळी शक्कल लढवत असतात .. त्यातीलच एक विरोध म्हणजे एकमेकांना राम राम म्हणायची पध्दत ही शिवछत्रपतींच्या नंतरच्या काळात म्हणजे पेशवे काळात सुरु झाली असे त्यांचे म्हणणे असते ...
'एकमेकांना भेटलो की राम राम म्हणायची पद्धत खूप जुनी आहे' असे मत इतिहासाचे अभ्यासक बळवंतराव दळवी यांनी मांडले आणि त्याला संदर्भ म्हणून खालील शिवकालीन पत्र त्यांनी आपल्या वाचकांसमोर प्रस्तुत केले आहे.
मिर्झाराजे जयसिंह यांचे नाव घेताच पुरंदरचा तह आठवतो. आठवतात शिवछत्रपतींची आग्रा भेट आणि नंतर औरंगजेबाच्या हातावर तुरी देउन पसार झालेले महाराज .... याच आग्रा भेटीच्या वेळी मोगलांकडील रजपुतांच्या दफ्तरात जो इतिहास लिहिला गेला त्यापैकी एक मुख्य संदर्भ म्हणजे राजस्थानी रेकॉर्ड मधील एका पत्रातील 'राम राम' उल्लेख इतिहास अभ्यासक बळवंतराव दळवींनी इथे दिला आहे ....
मुळ राजस्थानी पत्र -
…… अपरंच सेवोजी १७ जिलकादने मलुकचंद की सराई आणी डेरो कियो | तब श्री महारज कंवार जी गिरधरलाल मुंशी ने सिरोपाव एक खासगी वकस्यो व बारगीर घोडो रुपा की जोट से दियो, फुरमायो "तु वाठो जा म्हारो राम राम कही आव" अनसु कह आयो | सेवोजी सिरोपाव एक व रोक रुपया दो सो दे विदा कियो जी |
मराठीत भाषांतर -
११ मे शिवाजी मुलुकचंद सराईला आला आणि त्याने तेथेच मुक्काम केला. कुंवर रामसिंगाने आपला मुनशी गिरिधरलाल याबरोबर एक शिरपाव व चांदीच्या जिनाबारगीरसह घोडे देउन 'तू पुढे जा आणि माझा शिवाजीला राम राम प्रविष्ट कर . त्याप्रमाणे गिरिधरलाल ३५ -४० पायदळांसह गेला व त्याने आपल्या धन्याचा 'राम राम 'प्रविष्ट करून रायसिंगानी कळविल्याप्रमाणे भेटीची व्यवस्था झाली असल्याचे सांगितले. शिवाजीने गिरिधरलालला २०० रुपये बक्षीस व एक पोशाख देउन निरोप दिला.
वरील १५ मे १६६६ च्या राजस्थानमधील रेकॉर्डचा उल्लेख वाचल्यावर हिंदूंमध्ये राम राम म्हणण्याची पद्धत किती जुनी होती हे या मुळ पत्रावरून समजते ! हा उल्लेख कोणा ब्राह्मणाने लिहिलेला नसून एका क्षत्रिय कुळात जन्मलेल्या रजपुतांच्या रोजनिशी पत्रातील अस्सल उल्लेख आहे. त्यामुळे भगवान श्रीरामांचे स्मरण म्हणून राम राम म्हणायची पध्दत भारतात नव्हती असा प्रश्न विचारणार्यांनी वरील मूळ संदर्भ नक्की तपासावा !
- बळवंतराव दळवी
( शिवचरित्र अभ्यासक )
२ एप्रिल २०२०
@divyadrushti.bolgspot 2020
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा