किल्ले रायगडावरील 'त्या' अपरिचित तोफा

  गेली २० वर्षे सातत्याने किल्ले रायगडावर जाणारे शिवचरित्र अभ्यासक बळवंतराव दळवी यांनी स्वतः किल्ले रायगडावर पाहिलेल्या त्या सर्व अपरिचित तोफांची माहिती देताना आमच्या प्रतिनिधींशी केलेला हा संवादपर माहिती लेख...

"वि.वा. जोशी यांचे १९२९ साली लिहिलेल्या  'राजधानी रायगड' या पुस्तकात रायगडावरील तोफांविषयी लिहिलेले आहे. त्यांना १४ ते १५ तोफा रायगडावर आढळल्या होत्या. त्यानंतर १९६२ साली शा. वि. आवळस्कर यांच्या 'रायगडाची जीवनकथा' या पुस्तकात १७ तोफांविषयी जुजबी माहिती आहे. गो. नी. दांडेकर यांनी १९६५ साली लिहिलेल्या 'शिवतीर्थ रायगड' या पुस्तकात त्यांनी रायगडावरील १५ तोफांविषयी बरीच व्यवस्थित आणि विस्तृत माहिती लिहिलेली आहे.

आज रायगडावर १५ तोफा दिसतात.  परंतु शिवकालात बहुत तोफा असल्या पाहिजेत. बहुधा त्यातील बऱ्याचशा इंग्रज आणि पोतुगीजांकडून घेतलेल्या असाव्यात. इंग्रज - पोतुगीजांकडील तोफा चांगल्या उत्तम घडणींच्या असतात हे शिवछत्रपतींना माहित होते. नसत्या गोष्टीत स्वदेशीचा अभिमान धरण्याइतके ते हेकट कधींच नव्हतें.  तोफांनी सुसज्ज सैन्य समोरुन चालून येत असतां आपण रथात बसून गदाधारी होऊन शंख फुंकण्याचा आचरटपणा त्यांनी कधीच केला नाही.

शिवछत्रपतींनी काही घडीव तोफां इथेच तयार करण्याचा प्रयत्न करुन पाहिला. कडीमागें कडीं ठोकून रचलेल्या तोफा म्हणजे भारतीयांच्या शस्त्ररचना शास्त्रातील अथक प्रयत्नांचे प्रत्यंतरच आहे. या जातीची एक लहानगी तोफ नगारखान्या समोरुन कुशावर्ताकडे उतरत असतां डाव्या हातस पडलेली होती. (ती आज होळीच्या माळावरील शिवछत्रपतींच्या मुर्तीपाशी रचून ठेवण्यात आली आहे ) पण अशा तोफा रचीत बसणें हे मोठे कष्टदायक काम होते. आणि पुन्हा त्यांची घडण सफाईदार होत नसेच. तेव्हा शिवछत्रपतींनी अनेक तोफा खरेदी केल्या. अशी अनेक पत्रे उपलब्ध आहेत. त्यात पितळी तोफाही शिवरायांनी मागितल्याची नोंद आहेत. (पहा शिवकालिन पत्र सार खंड १ व २  ) त्या तोफा मोठ्या यत्नांने रायगडावर आणून मांडल्या. महाद्वार शेजारचे सगळे बुरुज, वाघ दरवाजाचा बुरुज, हिरकणी बुरुज, खुबलढा बुरुज, मदार माची इ. अनेक लढाऊ ठिकाणें त्या काळी बुलंद तोफांनी सुसज्ज ठेवल्या असतील.

शिवछत्रपतीं आणि शंभूराजांच्या निधनांनतर
जेव्हा गड सिद्दीकडे होता. तेव्हा त्याने नक्कीच गडांवरील काही उमद्या तोफा जंजिऱ्यावर पळविल्या असाव्यात. कदाचित आज ज्या तोफा जंजिरा किल्ल्यांवर आहेत त्यापैकी काहीं रायगडावरील असाव्यात.

या तोफांची व्यवस्था मोठी उत्तम ठेवली जात असे . पावसाळ्यात त्या गंजू नये म्हणून त्यांच्यावर निर्गुडीच्या डाहाळ्यांचे छप्पर घालीत. त्यांच्या कानात मेण भरुन ठेवीत. सर्दाव्यामुळे त्या खराब होऊ नयेत म्हणून त्या मधून मधून उडवून लावले जाई असा संदर्भ आवळसकरांच्या पुस्तकात सापडतो.

इ.स. १८१३ -१४ मध्ये रायगडावर १७ तोफा होत्या अशी नोँद पेशवे दप्तरात सापडते. त्यांची नावे पुढील प्रमाणे होती - 
१) गंगासागर २) मुलना ३) पेरुजंगी ४) भुजंग ५) रामचंगी ६) फत्तेलष्कर ७) पद्मीण ८) फत्तेजंग ९) सुंदर १०) रेकम ११) मुंगसी १२) शिवप्रसाद १३) गणेशबार १४) भवानी १५) चांदणी १६) लांडाकसाब १७) नागीण

आज गडावर या पैकी १५ तोफा इथें तिथें पडलेल्या आहेत. काही मातीत गाडल्या गेलेल्या आहेत. कुठल्या तोफेचे काय नाव हे कळायला आज काहीच मार्ग नाही.

यापैकी  मदार माची जवळची १, महादरवाज्या जवळच्या २ तोफा, हिरकणी बुरुजाजवळच्या ३, होळीच्या माळावरील शिवछत्रपतींच्या मुर्ती शेजारच्या २ लहान तोफा. एवढ्याच बहुतेकांना ठाऊक आहेत.

आता तुम्हांला सर्व १५ तोफा कुठे कुठे आहे हे दाखवतो . वरील ८ तोफा सर्वश्रुत आहेच. उरलेल्या ७ तोफांपैकी ३ तोफा महादरवाजा ते टकमकावरील तिसऱ्या बुरुजांवर आणि पाचव्या बुरुजावर आहेत. त्यापैकी एका मोठ्या तोफावर निशाण आणि 25-3-0 अशी इंग्रजी आकडे कोरलेले आहे आणि सोबत त्यावर इंग्लंडचे राजचिन्हही त्यावर आहे.

२ तोफा महादरवाजा ते हिरकणी या टप्प्यांमधील बुरुजांवर आहेत. एक शेवटचा बुरुजावर झाडीत पडलेली आहे तर दुसरी दुसऱ्या तिसऱ्या बुरुजाशेजारी मातीत गाडली गेलीय. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मुंबईतील धारकऱ्यांनी २६ डिसेंबर २०१५ रोजी  त्या दोन्ही अवजड तोफा मातीतून बाहेर काढून मोठ्या दगडी त्या खाली नीट रचून ठेवल्या जेणेकरून पाण्यासोबत वाहून येणारा गाळ, माती त्या तोफांवर पुन्हा साचू नये. त्या तोफांनी नक्कीच मोकळा श्वास घेतला असेल. दोन तोफा हिरकणी बुरुजाकडे जाताना उजव्या बाजूस खाली  झुडपात पडलेल्या आहेत. नीट लक्ष देउन पाहिल्यास त्या दिसतात. या झाल्या रायगडावरील तोफा.

१ मोठी तोफ रायगडवाडीत मारुतीच्या मंदिराशेजारी तिथल्या गावकऱ्यांनी चौथरा रचून ठेवली आहे. त्या शेजारीच काही दगडी गोळे आहेत.

वरील सर्व तोफा  बळवंतराव दळवी यांनी स्वतः शोधल्या आणि पाहिल्या आहेत. "जेव्हा  पुढीलवेळी तुम्ही पुन्हा रायगडावर जाल तेव्हा या तोफां नक्की पहा. तोफांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. नीट धमधमे रचून त्यावर या तोफा व्यवस्थितपणे ठेवण्याची गरज आहे. आपण फार करू शकलो नाही तरी जितकं शक्य आहे तितकं आपण शिवभक्त म्हणून करायला हवं .. कधी तो सुदीन उगवेल ते शिवछत्रपतीच जाणों !" 

Copyright (c) 2021 All rights reserved

©divyadrushtibolgspot2021

======

बळवंतराव दळवींचे Youtube video पाहण्यासाठी 
www.youtube.com/c/BalwantraoDalvi


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??