गडावर भेटणारा तो अनोळखी गडी
आपल्याला कुठे जायचे आहे. कुठल्या मार्गाने जायचे आहे. यांचे आणि आपले नाते नक्की कधी जुळले ? काय आहे हे नातं ? कोण आहेत की निष्ठावंत साथ देणारी आणि तुमच्याकडून काहीच अपेक्षा न ठेवणारी ? गडाचा सगळा घेरा, त्यांच्या वाटा सर्व काही यांना आधीच ठाऊक असल्यासारखं, गडावरील प्रत्येक ठिकाण यांना ठाऊक असते. कोण असतात ही.....
गडावर भेटणारा तो अनोळखी गडी
--------------------------------------
- बळवंतराव दळवी
ओळख नाही पाळख नाही न त्याला आपण स्वतःहून गडकिल्ल्यावर जातानाचा संदेश दिला असतो. पण जणू आपण गडावर येणार हे त्याला आधीच कोणी सांगितलेलं !
कधी तो फार पुढे तर कधी वाट बघत दुरुन आपल्याकडे लक्ष ठेवू असतो. आपण थोडा विसावा घेतो. तो लगेच आपल्या जवळ येतो. आपल्याकडे पाहतो. जणू म्हणत असतो, "चाला बिगीन बिगीन लैय चढ हाय अजून." तो पुढे असल्याने आपल्याला मार्ग चुकण्याची भिती नसते. आपण ढसाढसा पाणी ढोसतो. त्याला मात्र गड चढायच्या मार्गात एकदाही पाणी पिताना मी पाहिले नाही.
किल्ले रायगडावर तर अगदी पाचाडपासून गडावरच्या धर्मशाळेत पोहचते करण्यापर्यंत तो नेहमीच सोबत असतो. अगदी पहाटे ४. ३० वा. गड चढणीला सुरुवात केली तरी तो मात्र हजर असतो.
मागील वर्षी राजगड ते तोरणा अळू दरवाजा मार्गे मोहीम केली होती. पल्ला फार लांबचा होता. डोंगरसोंडेने तोरणा किल्ल्यावर पोहचलो होतो. तेव्हाही एक श्वान आमची सोबत करत होता.
सुधागड - सरसगड मोहिमेत तो अनोळखी गडी पुन्हा भेटला. त्याच नक्की नाव काय ठाऊक नाही. पण आमच्यापैकी कोण त्याला मोती, तर कोणी चित्या तर कोणी वाघ्या म्हणत. त्याला कोणी ' ऐ थांब ' असं जरी म्हटल तरी तो थांबायचा. तो कुत्रा आमची सोबत सोडत नव्हता. पाच्छापूर मार्गे गडावर जाण्यासाठी जो दरवाजा लागतो, त्याच्या वर खडकात एक पाण्याच टाक आहे. पाणी पिण्यालायक होते. तिथेही हा कुत्रा आमच्या सोबत थांबला. आम्ही पाण्याच्या बाटल्या भरेपर्यंत त्याने झाडाच्या सावलीत काही क्षणभर विश्रांती घेतली. आम्ही पुन्हा दरवाजामार्गे गडावर जाणार इतक्यात त्या कुत्र्याने मधल्या मार्गावर चढाई सुरु केली. आम्हीही मग त्याच्या मागोमाग वर चढलो. पाहतो तर हा मार्ग मुख्य मार्गाला मिळत होता. पुन्हा तो आमच्या तुकडीच्या पुढे जाऊ लागला. आम्ही थांबलो की तो ही थांबायचा. आम्ही पंतसचिवांच्या वाड्यात पोहचलो. तिथेही हा आला. आत एक आणखी कुत्रं होत. त्यावर हा गुरगुरु लागला. तसा त्या दुसऱ्या कुत्र्यांने धुम ठोकली. जणू याला सांगयाच होत की, "ही माझी माणसं आहेत. यांना त्रास दिलास तर याद राख."
पुढील दोन दिवस हा कुत्रा आमच्या सोबत गडावर होता. चोर दरवाजा, महादरवाजा, अगदी टकमक टोकावरही हा आमच्या पुढे पुढे पळत होता. आमच्या सोबत असलेल्या लहान मुलांना त्याची इतकी सवय झाली होती की ते आता आम्हाला मार्ग न विचारता त्या कुत्र्याच्या पाठी पाठी जाऊ लागले होते. आणि तो ही नेमक्या वाटेवर घेउन जात होता. जणू त्याला आमच्या मनात काय सुरु आहे हे ठाऊक होते.
उन्हाने आणि तहानेने त्रासलेले आम्ही कडेवर असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ पोहचलो. घोटभर पाणी ढोसले. जेवणासाठी पाणी भरून घेतले. जेवणाच्या वेळी त्याला जवळ बोलावून चपाती दिली. त्यानेही ती लगेच फस्त केली. आमच्या सुनील महाडिकांनी त्याला पाणी दिले. त्याने पोटभर पाणी पिउन झाल्यावर जीभ बाहेर काढून तोंड साफ केले आणि आमच्याकडे पाहत 'धन्यवाद' म्हणाला असावा !
दुसऱ्या दिवशी आम्ही गड उतरू लागलो. तेव्हा तो वाड्यात स्वस्थ पडला होता. आम्ही गड उतरत असताना तो कुत्रा पुन्हा आमची साथ देण्यासाठी आला. त्याला पाहिलं तेव्हा त्याचे डोळे सांगत होते, " काय राव, न सांगता निघालात तुम्ही ? आमचं काम हाय तुमास्नी साथ द्यायची. गडाखाली येतो आणि माझी जबाबदारी पार पाडतो." तो पुन्हा आमच्या पुढं पळत खाली उतरू लागला. पायथ्याशी एस. टी. आली. आम्ही गाडीत बसलो. माझी नजर त्याला शोधू लागली. बस सुरु झाली. आणि तो दुर एका घराशेजारी दिसला. आमच्याच बसकडे पाहत होता.... म्हणत होता,
" ओळख ठेवा !"
त्याची आठवण आल्यावर मनात राहून राहून काही प्रश्न उभे राहिले. अनेक गडांवर ही अशी साथ देणारी कुत्रें आपल्याला नेहमी दिसतात. यांना कसे काय कळते आपल्याला कुठे जायचे आहे. कुठल्या मार्गाने जायचे आहे. यांचे आणि आपले नाते नक्की कधी जुळले ? काय आहे हे नातं ? कोण आहेत की निष्ठावंत साथ देणारी आणि तुमच्याकडून काहीच अपेक्षा न ठेवणारी कुत्रे ? गडाचा सगळा घेरा, त्यांच्या वाटा सर्व काही यांना आधीच ठाऊक असल्यासारखं, गडावरील प्रत्येक ठिकाण यांना ठाऊक असते. कोण असतात ही कुत्रें ? यांच आणि गडकोटांच नातं काय असावं ? पुर्वजन्मीचं काही नातं ? नक्की ठाऊक नाही पण काहीतरी आहे हे मात्र खरं !
पुढं कधी गडावर तुम्हाला ते भेटले तर त्यांच्याशी नक्की बोला... तेही तुमच्यासोबत गुजगोष्टी करतील. त्यांच आणि आपलं नातं काय आहे हे सांगतील ! इतिहासात डोकावण्यासाठी तुम्हाला ते नक्की मदत करतील !
आपला शिवभक्त
बळवंतराव दळवी
--------
© http://divyadrushti.blogspot.com
दादांची दृष्टी म्हणजे नाद नाही❤️
उत्तर द्याहटवा