किल्ले रायगडावरील 'त्या' अपरिचित तोफा
गेली २० वर्षे सातत्याने किल्ले रायगडावर जाणारे शिवचरित्र अभ्यासक बळवंतराव दळवी यांनी स्वतः किल्ले रायगडावर पाहिलेल्या त्या सर्व अपरिचित तोफांची माहिती देताना आमच्या प्रतिनिधींशी केलेला हा संवादपर माहिती लेख... "वि.वा. जोशी यांचे १९२९ साली लिहिलेल्या 'राजधानी रायगड' या पुस्तकात रायगडावरील तोफांविषयी लिहिलेले आहे. त्यांना १४ ते १५ तोफा रायगडावर आढळल्या होत्या. त्यानंतर १९६२ साली शा. वि. आवळस्कर यांच्या 'रायगडाची जीवनकथा' या पुस्तकात १७ तोफांविषयी जुजबी माहिती आहे. गो. नी. दांडेकर यांनी १९६५ साली लिहिलेल्या ' शिवतीर्थ रायगड ' या पुस्तकात त्यांनी रायगडावरील १५ तोफांविषयी बरीच व्यवस्थित आणि विस्तृत माहिती लिहिलेली आहे. आज रायगडावर १५ तोफा दिसतात. परंतु शिवकालात बहुत तोफा असल्या पाहिजेत. बहुधा त्यातील बऱ्याचशा इंग्रज आणि पोतुगीजांकडून घेतलेल्या असाव्यात. इंग्रज - पोतुगीजांकडील तोफा चांगल्या उत्तम घडणींच्या असतात हे शिवछत्रपतींना माहित होते. नसत्या गोष्टीत स्वदेशीचा अभिमान धरण्याइतके ते हेकट कधींच नव्हतें. तोफांनी स...